ओमराजेंना परत आणण्यासाठी ठाकरे गटाचे युद्धपातळीवर प्रयत्न, संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या घरी पोहोचले

Foto
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अचानक मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.
अधिकृतपणे या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी गेल्या दोन-तीन दिवसांत ठाकरे गटाला लागलेले मोठे सुरुंग या भेटीमागे असण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याची आणि त्यांनी संसदेत नवा गट स्थापन केल्याची धक्कादायक घडामोड नुकतीच समोर आली आहे. या फुटीनंतर थेट संजय राऊत यांनी शिवतीर्थ गाठल्याने या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवतीर्थावरील कोणत्या चर्चांची शक्यता
 ठाकरे गटाचे जे ६ खासदार फुटले आहेत, त्यांच्यावर अपात्रतेची किंवा कोणती कायदेशीर कारवाई करता येऊ शकते का? तसेच राहिलेल्या लोकप्रतिनिधींची मनधरणी कशी करायची, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर कालच मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ऑपरेशन टायगर आणि भाजपमधील अंतर्गत समीकरणांवर भाष्य केले होते. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या जवळीकीवर तसेच भाजपमधील असंतोषावर राज ठाकरेंनी बोट ठेवले होते. या मुद्द्यांवर संजय राऊत राज ठाकरेंसोबत सविस्तर संवाद साधू शकतात. मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढले होते. मात्र, आता खासदार फुटल्यानंतर दोन्ही बाजूंचे नगरसेवकही फुटण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आपले उरलेले नगरसेवक पक्षात कसे टिकवून ठेवायचे आणि त्यांच्याशी कसा संपर्क ठेवायचा, याची रणनीती या बैठकीत ठरू शकते. ठाकरे गटावर ओढवलेल्या या मोठ्या राजकीय संकटामध्ये संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय गुप्त चर्चा होते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

शनिवारी मध्यरात्री ठाकरे गटाचे खासदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजे यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातही फोनवरुन बोलणे झाल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका जाणून घेतली.  ओमराजे यांचे नेमकं म्हणणं काय आहे हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतले. विशेष म्हणजे या फोन कॉलवर ओमराजे निंबाळकर यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबत असल्याचे उद्धव यांना सांगितले. आपणच मला मोठं केलं आहेय आज मी खासदार आहे, ते पक्षामुळे, तुमच्यामुळे. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे. असे उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. 

रिलस्टार शब्द ओमराजेंच्या जिव्हारी लागला, नक्की काय घडलं?
एकीकडे भाषणातून, प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून ओमराजे निंबाळकर यांना उबाठा नेत्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली असतानाच, दुसरीकडे त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न देखील ठाकरे गटाने सुरूच ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. कालचा निकालाचा दिवस ओमराजे यांच्यासाठी उद्विग्न करणारा असताना देखील त्यांना काल संजय राऊत आणि इतर नेत्यांनी केलेल्या जहरी टीकेमुळे ओमराजे नाराज  झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर वैयक्तिक आणि घराण्यावर केलेल्या टीकेमुळे ओमराजेंना मानसिक त्रास झाल्याचे सांगितले जाते. मात्र,  दिवसभर केलेल्या टीकेनंतर देखील रात्री पुन्हा काही माणसे पाठवून ओमराजे यांचे मन वळवण्याचे प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरु आहेत. मी अजून निर्णय घेतला नाही, असे ओमराजे यांनी सांगितल्याने ठाकरे गटाचे त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत.